Thursday, July 28, 2011
शिरवळच्या ग्रामस्थांचे श्रद्धास्थान म्हणजे श्रीअंबाबाई म्हणजेच अंबाई. श्रीअंबाबाई हीच शिरवळची ग्रामदेवता.ही जागृत देवता नवसाला पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे.दरवर्षी अक्षयतृतीयेला देवीचा महोत्सव असतो.
सुमारे ८०० वर्षांपूर्वी केदारेश्वर मंदिराच्या शेजारच्या शेतात गुंजावटे नामक गृहस्थाला नांगरताना या देवीची मूर्ती सापडली.ती त्याने प्रथम आपल्या घरी आणून ठेवली.नंतर त्याने ती शेटे यांच्या चावडीच्या जागी आणून ठेवली.त्याजागेवरच काही भाविक तिची पूजा करत.त्यानंतर काही दिवसांनी त्या जागी एका चौथर्यावर घुमट बांधून तिची स्थापना करण्यात आली व नित्य पुजाअर्चा होऊ लागली.त्यावेळी मंदिर खूप लहान होते.गाभारा,सभामंडप नव्हता.या मंदिरासमोर असणार्या एका गुजराथी गृहस्थाने श्रद्धेने मंदिराचा गाभारा बांधला.पुढे श्रद्धावान भक्तानी एका खणाचे सभामंडपाचे बांधकाम केले.कालांतराने आजचा सभामंडप व त्यापुढची इमारत उभी राहिली.आज शेटे घराण्याकडेच या मंदिराची व्यवस्था आहे.
श्रीअंबाबाईची मूर्ती सायुध आहे.ती महिषासुरमर्दिनी आहे.काळया पाषाणाची मूर्ती रेखीव व सुबक आहे.चैत्र महिन्यात रामनवमीपासून या देवीचा उत्सव चालू होतो तो वैशाख शुद्ध पौर्णिमेपर्यंत चालतो.रामनवमीच्या दुसर्या दिवशी देवीची मानाची काठी तूळजापूरला जाण्यासाठी मानकर्यासह बाहेर पडते.काठी रात्रभर ग्रामस्थांच्या दर्शनार्थ बाजारपेठेत राहते आणि सकाळी श्रीमंडादेवीच्या मार्गाने तूळजापूरला जाण्यासाठी परंपरेनुसार निघते.नारळाचे तोरण बांधून श्रद्धाळू नैवेद्य अर्पण करतात.अक्षयतृतीयेला मोठी यात्रा भरते.याप्रसंगी चार दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात. शिरवळ पंचक्रोशीतील सर्व लोक या यात्रेस हजेरी लावतात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment